लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.हिवाळ्यात पौष्टिक आहार म्हणून सुकामेव्याला मोठी मागणी असते. हिंगोली शहरात सुकामेव्याची ठिक-ठिकाणी दुकाने थाटली आहेत. परंतु यंदा कडाक्याची थंडी अजूनही पडली नाही. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्याची पंधरा तारीख उलटली असली तरी ग्राहकांची सुकामेवा खरेदीसाठी मोठी गर्दी नाही. शहरासह ग्रामीण भागातून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेत्यांतून सांगण्यात आले. जस-जशी थंडी वाढत जाईल तशी ग्राहकांची गर्दी वाढेल. परंतु मागील दोन दिवसांपासून बाजारात सुकामेवा खरेदीसाठी तुरळक गर्दी होताना दिसून येत आहे. डिंकाचे तयार लाडूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हिवाळा म्हटला की, सकस आहार, डिकांचे लाडू व सुकामेवा तसेच व्यायामाकडे तरूणाईचा कल असतो.सुकामेवा गिरण्यांवरही गर्दी नाही..हिंगोली शहरातील आरामशिन परिसरात सुकामेवा बारीक करण्यासाठी गिरणीवर हिवाळ्यात मोठी गर्दी होते. परंतु यंदा थंडी कमी पडल्याने मात्र सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गर्दी नसल्याचे गिरणीचालक मिराबाई गव्हाणकर यांनी सांगितले. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे सुकामेवा बारीक करून घेण्यासाठी गिरणीवर गर्दी होते. यंदा मात्र अल्पप्रतिसाद आहे.शहरासह ग्रामीण भागातून गिरणीवर गर्दी होते. दहा रूपये प्रतिकिलोग्रॅमने सुकामेवा दळून दिला जातो. परंतु यंदा थंडीच नसल्याने दिवसांतून चार ते पाच ग्राहक येत आहेत, असे गिरणीचालक गणेश गव्हाणकर यांनी सांगितले. थंडी वाढल्यानंतर मात्र शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांची गिरणीवर गर्दी होईल, अशी अपेक्षा गव्हाणकर यांनी व्यक्त केली.हिंगोली येथील बाजारात सुकामेवा दाखल झाला आहे. बदाम ७६० ते ८०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच काजू ९०० ते १ हजार रूपये किलो, खोबरा १६० तर राजापुरी खोबरा २०० रूपये किलो, चाराची गोडंबी १ हजार रूपये किलो, बिबाची गोडंबी ५०० ते ५५० रूपये किलो, अमरावती व बलीया साखर ६० रूपये किलो, अंजीर १२०० रूपये किलो, जरदाळु ८०० ते १ हजार रूपये, तूप ५०० ते ६०० रूपये किलो दराने विक्री होत आहे. परंतु यंदा कडाक्याची थंडी नसल्याने ग्राहकांतून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सुकामेवा विक्रेते नितीन अग्रवाल यांनी सांगितले. ग्रामीण भगातूनही तुरळक गर्दी आहे.
सुका मेवा खरेदीस ग्राहकांतून अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:34 AM