हिंगोली : कोरोचा वाढता कहर पाहता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ६ ते १९ ऑगस्ट या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गुरूवारी शहरातील मुख्य रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट दिसून आला. तर सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान शहरातील काही भागामध्ये यात गांधी चौक व फुलमंडी परिसरात तुरळक गर्दी दिसून आली. हा परिसर वगळता सर्वत्र कडक संचारबंदीचे चित्र दिसून आले. शहरात जागो-जागी कडेकोट पोलीस बंदोस्त असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिस प्रसाद देत होते.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे संसर्ग रोखता यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक संचारबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने ६ ऑगस्टपासून हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असून १९ ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील मुख्य रस्ते संचारबंदीमुळे सामसूम होते. शहरातील अग्रसेन चौक, बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक तसेच गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जवाहर रोडवर यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त दिसून आला.
शहरात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हजर होते. हिंगोली जिल्ह्यात ५ आॅगस्टच्या रात्री १२ वाजेपासून संचारबंदी सुरू झाली आहे. संचारबंदी कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ पर्यंत चालू ठेवण्यास मुभा आहे. तसेच सर्व बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहणार आहेत. बँक, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र जवळ ठेवून कार्यालयीन वेळेत ये-जा करण्यास मुभा राहील. फक्त खाजगी रुग्णालयास संलग्न औषधी दुकाने रुग्णालय वेळेप्रमाणे तर आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार औषधी दुकानांना चालू ठेवण्यास मुभा आहे. पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी वर्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.