- रमेश कदमआखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बाळापूरमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. सशस्त्र चोरट्यांनी साईनगर परिसरात तीन घरांच्या गेटचे कुलूप तोडले. चोरीचा प्रयत्न करत असतानाच रात्रगस्तीवर असलेले पोलिस धडकले. यामुळे चोरट्यांनी पोलिसा काठीने हल्ला केला. मध्यरात्रीच्या अंधारात चोर आणि पोलिसांचा हा खेळ पहाटेपर्यंत चालला. मात्र, चिखलाच रस्ता आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
आखाडा बाळापूर येथील साई मंदिर परिसर व माधवनगर परिसरात दिनांक 1 जुलै रोजी रात्री बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरी चोरीचे प्रयत्न केले. एका घराच्या गेटचे कुलूप तोडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी राजीव जाधव व सरकटे चोरट्यांचा मागोवा घेत तिकडे पोहोचले. पोलिस पाठलाग करत असल्याचे समजताच गेटचे कुलूप तोडलेले घर सोडून चोरटे दुसऱ्या भागाकडे गेले . तिथेही घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पुन्हा पोलीस पाठलाग करत गेले. त्यावेळी त्यांना चार सशस्त्र चोरटे दिसले.
दरम्यान, चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दुचाकी आडवी लावली. त्यामुळे संतप्त चोरट्यांनी हातातली बांबूची काठी पोलिसांवर भिरकवली. रात्र गस्तीला असलेले पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले . रात्रभर चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . परंतु नाल्याच्या बाजूने अंधाराचा आणि चिखलाचा आधार घेत चोरटे पसार झाले.
पोलीस घटनास्थळी असतानाही हे सशस्त्र चोरटे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत होते. पोलिसांसोबत माधवनगर, साईनगर भागातील नागरिकही जागे झाले होते . परंतु सशस्त्र चोरट्यांचा पाठलाग करताना कोणीही पुढे धजावले नाही. काही दिवसांपूर्वीच या भागात तीन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.