lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:43 PM2019-03-19T20:43:15+5:302019-03-19T20:43:46+5:30
भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे.
- विजय पाटील
हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील उमेदवारच निश्चित होत नसल्याने सर्वच पक्षांना घोर लागलेला आहे. काँग्रेस व शिवसेनेत लढत होणार की एखादा पक्ष ही जागा दुसऱ्याला सोडणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. राजीव सातव यांनी अजूनही त्यांच्या उमेदवारीचे पत्ते उघड केलेले नाहीत. मध्यंतरी आ. संतोष टारफे यांनीही चाचपणी फेरी केल्याने या संभ्रमावस्थेत अधिकच भर पडली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून मागच्या वेळी पराभूत झालेले सुभाष वानखेडे आता भाजपमध्ये आहेत. तर सेनेला येथे नवा चेहरा द्यावा लागणार आहे. तो निवडणेच अवघड बनले आहे. आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील व आ.नागेश पाटील आष्टीकर हे तिघे इच्छुक आघाडीवर आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, याच्या चर्चा झडत आहेत. मात्र निर्णय होताना दिसत नाही. काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ आहेत. मागच्या वेळी तब्बल २३ जण रिंगणात होते. यंदा थेट लढतीचीच चिन्हे आहेत.
वावड्या
भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे. कधी भिवंडी तर कधी कुठल्या तरी मतदारसंघाचे नाव सांगून कार्यकर्त्यांना ‘जागे’ ठेवले जात आहे. दुसरीकडे शिवराज पाटील चाकूरकरांसाठी उस्मानाबाद काँग्रेस सोडवून घेणार असल्याचे सांगून हिंगोली राष्ट्रवादीला परत केला जाणार असल्याच्या नव्या वावड्यांना तोंड फुटले आहे. सूर्यकांता पाटील पुन्हा राकाँत येऊन लढणार असल्याचे सांगितले जाते. उमेदवाऱ्या जाहीर करेपर्यंत या वावड्या उठतच राहणार असल्याचे दिसते.