Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत सेनेचा उमेदवार जाहीर, काँग्रेसमध्ये शांतताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:18 PM2019-03-23T18:18:36+5:302019-03-23T18:22:14+5:30
उपरा उमेदवार लादल्याचा आरोपही काही शिवसैनिकांतून होत आहे.
- विजय पाटील
हिंगोली : शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून, मतदारसंघाचे लक्ष आता काँग्रेसच्या उमेदवाराकडे लागलेले आहे. खा. राजीव सातव हेच लढणार की अन्य कोणी उमेदवार? हा तिढा कायम आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेत उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच होती. बाहेरून आलेल्यांना, परक्यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणून पत्रकार परिषदाही घेण्यात येत होत्या. वसमतचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचीच उमेदवारी अंतिम मानली जात होती; मात्र नांदेडचे आ. हेमंत पाटील व सुभाष वानखेडे यांचाही मराठा कार्ड म्हणून शिवसेनेने विचार चालविला होता. यात अखेर हेमंत पाटील यांचे नाव निश्चित झाले.
एकीकडे शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. या उमेदवारीबाबतही कोणी बोलायला तयार नाही. खा. राजीव सातव हेच लढणार की अन्य कोणी? याबाबतही अनिश्चितताच आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नांदेडात बैठक घेतली. त्यात मतदारसंघातील आ. प्रदीप नाईक, माजी आ. जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊ राव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पा. जवळगावकर यांची मते जाणून घेतली.
सातव यांची लढायची इच्छा असली तरीही त्यांच्याकडे गुजरातच्या प्रभारी पदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे त्यांना येथे वेळ देणे शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय ते नसतील तर अॅड. शिवाजी जाधव, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या नावांचाही काँग्रेसकडून विचार सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेने जसा नवा चेहरा मैदानात उतरविला तसाच काँग्रेसचाही प्रयत्न असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी आ. संतोष टारफे यांनीही चाचपणी केली होती. खा. सातव यांचे ते खंदे समर्थक आहेत.
काँग्रेसच्या बैठकीची चर्चा
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. विद्यमान खासदार या मतदारसंघात असताना प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी ही बैठक घेतल्याने उमेदवार बदलाचे तर संकेत नाहीत ना, अशी चर्चा रंगत आहे.
उपरा उमेदवार लादल्याचा आरोप
एकीकडे जल्लोष होत असताना मतदारसंघात आधीपासूनच असलेल्या कोणालाच उमेदवारी न देता नांदेडचे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांच्या रुपाने उपरा उमेदवार लादल्याचा आरोपही काही शिवसैनिकांतून होत आहे.