- विजय पाटील
हिंगोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत खा. राजीव सातव यांनी पराभूत केलेले शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे यांना रविवारी काँग्रेसने पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हिंगोलीत हेमंत पाटील विरुद्ध वानखेडे, या आजी-माजी शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेडचे आ. हेमंत पाटील यांना शिवसेनेने आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या वेळी मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचा सफाया होत असताना नांदेडसोबत हिंगोलीने काँग्रेसला साथ दिली. राजीव सातव यांनी त्यावेळी अगदी काठावर बाजी मारली होती. मात्र, यावेळी पक्षांतर्गत टोकाचा विरोध लक्षात घेता सातव लढणार नाहीत, अशी चर्चा सुरुवातीपासूनच मतदारसंघात होती. यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सध्या भाजपात असलेले अॅड. शिवाजी जाधव, माजी खा. सुभाष वानखेडे, हिंगोलीचे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नावावर विचार सुरू होता.
यापैकी वानखेडे हे मागच्या वेळी अवघ्या १,६३२ मतांच्या फरकाने पडलेले उमेदवार असल्याने त्यांचे पारडे जड ठरले. ते त्यावेळी शिवसेनेत होते. त्यामुळे सेना व भाजपामधूनही काहींची मदत मिळण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या निवडीला प्राधान्य दिले. प्रदेशाध्यक्षांनी हिंगोली मतदारसंघातील नेत्यांवरच उमेदवार देण्याची जबाबदारी सोपवली होती. हे करताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही बोलावले होते. त्यामुळे आ. प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर आदींनी उमेदवार निश्चित केल्याने ही सगळीच मंडळी एकदिलाने दिसली. माजी खा. सातव यांनीही याच नावाला हिरवी झेंडी दाखविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरुवातीला आघाडीवर असलेले जाधव यांचे नाव नंतर मागे पडले.
काँग्रेसने अचानक टाकलेल्या या बॉम्बगोळ्यामुळे शिवसेनेतही चलबिचल निर्माण झाली आहे. उपरा उमेदवार म्हणून काही शिवसैनिकांची नाराजी असतानाच जुन्या शिवसैनिकाशी लढा देण्याचा प्रसंग हेमंत पाटील यांच्यावर ओढावला आहे. मात्र, मागच्या वेळी वानखेडे यांना विरोध करणाऱ्या सेनेतील काही नेतेमंडळींना आता विरोधी पक्षाकडूनही वानखेडेच समोर आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. गजानन घुगे यांच्यावर मागच्या वेळी सेनेचे काम न केल्याचा ठपका शिवसैनिकांनीही ठेवला होता. आताही आ. मुंदडा यांना ऐनवेळी डावलले. त्यामुळे ते नाराज असले तरीही तसे जाहीर प्रदर्शित झालेले नाही, तर घुगे हे सेनेचा मित्रपक्ष भाजपात आहेत.
सेना-भाजपला कंटाळून वानखेडे काँग्रेसमध्ये -चव्हाणभारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कंटाळून माजी खा. सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या विधानसभा आणि लोकसभेतील कामकाजाच्या अनुभवाचा काँग्रेसला निश्चितपणे फायदा होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
मातोश्रीवरूनच झाला पराभव - वानखेडेमाजी खा. वानखेडे यांनी २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी आपला पराभव केला त्यांना मातोश्रीवरून प्रमोशन मिळाले. आपला मागचा पराभव हा मातोश्रीवरूनच झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या निवडणुकीतही आपण हिंगोलीतून शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती; पण ऐनवेळी दुसऱ्या मतदार संघातील आयात उमेदवार हिंगोलीत लादल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपत चांगल्या कार्यकर्त्यांची किंमत होत नाही. त्याचवेळी मोदी सरकार केवळ घोषणा करते. त्यांची अंमलबजावणी मात्र करत नाही, असा आरोपही वानखेडे यांनी केला.
वंचित आघाडीचाही उमेदवार वंचित आघाडीकडून मोहन राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या वेळी किनवट विधानसभा निवडणुकीसाठी ते उभे होते. त्यांना तीन हजारांच्या आतच मते मिळाली होती. काही दिवसांपूर्वी हिंगोलीत प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली तेव्हा यापेक्षा जास्त गर्दी होती.