- विजय पाटील
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निश्चित आकडेवारी सांगणे अवघड असले तरीही दलित, मुस्लिम, ओबीसी मतदारसंख्या ३५ टक्क्यांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. मात्र ही गठ्ठा मते कुणा एकाच्या पारड्यात जातील, असे म्हणने धाडसाचे ठरणार आहे.
या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर येथे १९९६ मध्ये माधवराव नाईक यांनी भारिपकडून १ लाख २४ हजार एवढी प्रभावी मते घेवून दुसरे स्थान मिळविले होते. १९९८ ला विश्राम घेवून त्यांनीच पुन्हा १९९९ ला दोन लाख ८ हजारांचा पल्ला गाठत पराभव पत्करला. २00४ ला भारिपकडून संजय राठोड होते. त्यांना २५ हजार मतांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर भारिपला उतरती कळा लागली अन् बसपा पुढे आली. २00९ मध्ये नाईक यांना ५२ हजार तर बसपाचे बी.डी. चव्हाण यांना १ लाख ११ हजार मते होती. २0१४ मध्येही बसपाचे चुन्नीलाल जाधवांना २५ हजार तर भारिपच्या रामराव राठोड यांना ९५७७ मते होती. यावरून भारिपची सातत्याने पिछेहाट होत गेल्याचे दिसते. तर ही मते कधी बसपाकडे झुकली तर कधी काँग्रेसच्या पारड्यात गेली.
प्रभावी यंत्रणा उभारणे गरजेचे मोहन राठोड हे किनवटचे आहेत. किनवट वगळता इतरत्र प्रभावी यंत्रणा उभारणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जर यात त्यांना यश मिळाले तर ही बाब काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. च्यावेळी पुन्हा वंचित आघाडीच्या रुपाने मुस्लिम, दलित, ओबीसी मतांवर डोळा असला तरीही माधवराव नाईकांएवढा प्रभावी चेहरा यावेळी मैदानात नाही.