गोरेगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी निर्णय मागे घेतला आहे.
निवडणुकीच्या कामासाठी गावात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या कारणावरुन ग्रामस्थांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रवित्रा घेतला होता. सावखेडा येथे लोकसभा निवडणुकीसाठी चार शिक्षक व एक पोलीस असे एकूण पाच कर्मचारी नियुक्त केले होते. कर्मचारी 17 एप्रिल रोजी साबलखेडा येथे मुक्कामी गेले होते. गावातील रेशन दुकानदार संतोष देवराव भिसे यांनी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. वरण-भात-भाजी-पोळी असा पाच कर्मचाºयांचा डबा स्वत: नेऊन दिला होता. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था झाले नसल्याचे पोलीस ठाण्याला कळवले होते.
पोलिसांनी सावखेडा येथील समीर भिसे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सरपंच पती समीर भिसे यांनी संतोष भिसे यांना जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारले असता जेवणाचे डबे रात्री 8.30 वाजताच दिल्याचे सांगितले. तसेच आणखी काही अडचण असेल तर चक्कर करून बघतो, असे सांगितले नंतर संतोष भिसे सेवक चीनकुजी खरात, मारुती दत्तराव भिसे सह काही ग्रामस्थ विचारपूस करण्यासाठी गेले असता मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साध्या जेवणाबाबत नाराजी व्यक्त करीत कोंबडीच्या मटणाची भाजी आणि दारूची व्यवस्था का केली नाही? असे म्हणून नशेत तर्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ केली. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सकाळी मतदान कक्षात गेलेल्या बुथ एजंटना सुद्धा काय भाजीपाला न्यायला आले काय? तुमच्या गावाचे काय खरे नाही. असे म्हणत कर्मचाऱ्यांनी टोमणे मारले अशी माहिती समीर भिसे यांनी दिली.
रात्री घडलेल्या सदर प्रकारामुळे सावरखेडा येथील ग्रामस्थांनी सकाळी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मतदान न करण्याचा पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकला होता. याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुधाकर आढे, सेनगावचे नायब तहसीलदार भोजने यांना मिळताच त्यांनी मतदान केंद्राला भेट दिली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच तक्रार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास गोरेगाव येथे पाठवून दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला साबलखेडा येथे नियुक्त केले. तसेच लेखी तक्रार करा यानंतर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यावर कारवाई करील असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर तब्बल सव्वा दोन तासानंतर 9.15 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.