हिंगोली: कोरोना महामारी आता ओसरू लागली असून तीनच दिवसांमध्ये लांब पल्ल्याच्या बसेसनी जवळपास १८ हजार २२८ किलोमीटर प्रवास केला आहे. या तीन दिवसांमध्येच महामंडळाला २ लाख ५२ हजार ७९९ हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.
मागच्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत महामंडळाने सर्व बसेस आगारात उभ्या केल्या होत्या. आता कोरोनाचे रूग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने ६ जूनपासून बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आजमितीस ग्रामीण भाग वगळता लांब पल्ल्याच्या बसेस फक्त सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेसही लवकरच प्रवाशांच्या सेवेकरीता सुरू करण्यात येतील, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले,
दुसरीकडे कोरोना महामारी लक्षात घेता आगारप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एस.टी. महामंडळाने हिंगोली आगारातील सर्व चालक आणि वाहकांचे शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत आगारातून परभणी जिल्ह्यासाठी दर अर्ध्या तासाला तर नांदेड जिल्ह्यासाठी दर एक तासाला बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान चालक, वाहक आणि प्रवाशांनी मास्क घालावे, अशा सूचनाही एस.टी. महामंडळाने केल्या आहेत.
उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
कोरोना महामारीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हे पाहून आता चालक, वाहक व इतर कर्मचारी कामाला लागले आहेत. ‘प्रवासी हेच महामंडळाचे दैवत’ असल्याने त्यांना सूखकर प्रवास कसा देता येईल याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोना महामारी ओसरू लागली असली तरी संपलेली नाही. तेव्हा सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
- पी.बी. चौतमल, आगारप्रमुख