हिंगोली : जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एस. टी. महामंडळ ९ जूनपासून लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करणार असल्याची माहिती आगारप्रमुख पी. बी. चौतमल यांनी दिली.
मागील दोन महिन्यांमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार हिंगोली, कळमनुरी आणि वसमत आगारांतील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आज मितीस कोरोना ओसरु लागला आहे. दूर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ९ जून पासून बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चालक व वाहकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे प्रवासी प्रवासादरम्यान बसेसमध्ये चढतेवेळेस मास्क घालणार नाहीत, अशा प्रवाशांना बसमध्ये घेऊ नका, अशी सूचना चालक-वाहकांना दिली आहे. लांबपल्ल्याच्या बसेसमध्ये पुणे (सकाळी ८.४०, सायंकाळी ६), सोलापूर (सकाळी ९.३०), औरंगाबाद (सकाळी ७.३०), अकोला (सकाळी ७, ११, दुपारी १, ३) या मोठ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत बसेसला प्रवासी मिळत नसले तरी भविष्यात प्रवासी चांगले मिळतील, असेही आगारप्रमुखांनी सांगितले.
प्रत्येक बस सॅनिटायझरने स्वच्छ केली जाते
कोरोना महामारी लक्षात घेता प्रवाशांची योग्य ती काळजी घेतली जाते. आगारातून बस सोडतेवेळेस प्रारंभी बस पाण्याने स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर बसमध्ये सॅनिटायझरची फवारणी केली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरी अजून बसेस सुरु केल्या नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या जशा सूचना येतील त्या प्रमाणे एस. टी. महामंडळ सूृचनांचे पालन करेल.