हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह वसमत व कळमनुरीत पालिका निवडणुका होणार आहेत. हिंगोलीत थेट नगराध्यक्ष भाजपचा तर सर्वाधिक १२ सदस्य राष्ट्रवादीचे आले होते. कळमनुरीत नगराध्यक्षही सेनेचा व सर्वाधिक ९ सदस्यही त्यांचेच आले होते. वसमतला नगराध्यक्ष सेनेचा तर सर्वाधिक ८ सदस्य राष्ट्रवादीचे आले होते. त्यामुळे हिंगोली व वसमत येथे खिचडी शिजवून सत्ता चालवावी लागली. तर कळमनुरीत एकहाती कारभार आहे. यंदा प्रभाग रचनाही बदलणार व आरक्षणही त्यावरूनच पडणार आहे. आरक्षणात लोकसंख्येच्या निकषाची मागची गणितेही बदलतील. त्यामुळे काहींना थेट घरी बसण्याचीच वेळही येवू शकते. तर मोठ्या भागात दम काढणाऱ्या काहींना एवढ्या कमी भागात लढायचे असल्याने अतिशय सोपे जाणार आहे; मात्र लहान व एक सदस्यीय प्रभागात अचानक एखाद्या भागाला सामाजिक आधाराचा भाग जोडला गेला तर नव्या चेहऱ्यालाही लॉटरी लागू शकतो. अशा ठिकाणी तर दिग्गजांचीही कोंडी होऊ शकते. त्यामुळे अनेकांना आता ही प्रभाग रचना काय रंग आणते, याचे वेध लागले आहेत.
आरक्षणावरूनही तळ्यात मळ्यात
ओबीसीच्या आरक्षणावरूनही निवडणुका लांबणार की वेळेवर होणार? हा प्रश्नच आहे. राज्य पातळीवर विविध पक्षांनी ओबीसी आरक्षणानंतरच निवडणुकांवर एकमत केले; मात्र इम्पेरिकल डाटाचे काय? निवडणूक आयोग यासाठी तयार होईल का? हा प्रश्न आहे. तसे झाल्यास अचानक इच्छुकांची धावपळ होण्याचीही भीती आहे.
न.पं.तील इच्छुक आता थंडावले
जानेवारी २०२१ मध्ये प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्याने औंढा व सेनगावात कामाला लागलेले इच्छुक आता थंडावले. काहींनी तर जोशमध्ये खर्चपाणीही सुरू केले होते. अशांना मोठा फटकाही बसला. आता मात्र कोणी निवडणुकीचे नावही काढायला तयार नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की इच्छुक बिळातून बाहेर पडतील, असे दिसत आहे.