कोरोनाआधी जिल्ह्यातून पूर्णा-अकोला २ फेऱ्या व परळी- अकोला या रेल्वेची १ फेरी होत असे. कोरोनामुळे २०१९ पासून पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीनुसार काही महिन्यांपूर्वी ‘डेमो’ रेल्वे सुरू केली आहे. परंतु, लहान स्टेशनला ‘डेमो’ गाडी थांबत नाही. इतर ठिकाणी थांबत असली तरी, भाडे मात्र एक्स्प्रेसचे घेतले जात आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
‘डेमो’ गाडी सुरू केली; पण लहान स्टेशनला थांबतच नाही.
जिल्ह्यातील व्यापारी व प्रवाशांच्या मागणीवरून रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरू केली आहे. परंतु ही ‘डेमो’ कंजारा, पांगरा, जुनुना, मरसूल, पैनगंगा, काररोड आदी लहान स्टेशनला थांबत नाही. मग पॅसेंजर रेल्वे सुरू करून काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘तो’ निर्णय वरिष्ठस्तरावरील
पॅसेंजर रेल्वे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो वरिष्ठ पातळीवरील आहे. त्या निर्णयाबाबत अजून तरी माहिती मिळालेली नाही. एवढेच काय त्याबाबत कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झाली नाही.
- अलोक नारायणन, स्टेशन मास्टर
प्रतिक्रिया...
पॅसेंजरचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडते. दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. सध्या डेमो रेल्वे सुरू असली तरी भाडे मात्र एक्स्प्रेसचे आकारले जात आहे.
- प्रसाद ढोकणे, प्रवासी
शासनाने पॅसेंजर रेल्वे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा आहे. एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे हे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही.
- विश्वनाथ परवरे, प्रवासी