वसमत (हिंगोली ) : येथील मुख्य रस्त्यावरील कापड बाजारातील दोन दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले.
बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर चांगदेव अडकटलवार यांच्या कापड व प्रशांत लाहोटे यांच्या इलेक्ट्रिक दुकानास आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन्ही दुकाने भस्मसात झाली.
नागरिकांनी आगीची माहिती पोलिसांना व अग्निशमन दलास दिली. त्यानंतर पोलीस, नागरीक व अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे समोर येत आहे. पोलीस निरीक्षक आर.आर. धुन्ने यांनी घटनास्थळी भेट दिली.