हिंगोली : यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर निवारण परिस्थिती हाताळण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक होऊन त्या त्या विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात कयाधू, पैनगंगा, पूर्णा या प्रमुख नद्या आहेत. दरवर्षी या नद्या दुथडी भरून वाहतात. यावर्षी हवामान खात्याने भरपूर पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरामध्ये नागरिक, जनावरे वाहून जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हेलिकॉप्टरद्वारेही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. पुरामुळे जीवितहानी होऊ नये, म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग मागील २० दिवसांपासून तयारीला लागला आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर विविध साहित्य पुरविले असून योग्य प्रशिक्षणही दिले आहे. पूर बाधित क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये आपतीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबत पत्रके, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्रमुख नागरिकांचे संपर्क क्रमांकही घेण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील नाल्या वाहत्या करण्यात आल्या असून गाळ काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील नद्या - ०३
नदीशेजारी गावे - ७०
पूरबाधित होणारी तालुके - ५
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान - ८५९.६० मिमी
प्रशासनाची काय तयारी ?
लाईफ जॅकेट - ५०
अग्नीरोधक - १०
मोटार बोट - २
सर्च लाईट - १५
हेल्मेट - १२
लाईफ बॉईज - ५०
अग्निशमन दल सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नगरपालिकेचे अग्निशमन दल, पाचही तालुक्यातील तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर पंचायती सज्ज झाल्या आहेत.
हिंगोली येथे दोन अग्नीशमन वाहन उपलब्ध असून कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा येथे प्रत्येकी एक वाहन उपलब्ध आहे. प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तसेच पोलीस विभाग, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयात २१ प्रकारचे शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पूरबाधित क्षेत्र
जिल्ह्यात कयाधू, पैनगंगा, पूर्णा या प्रमुख नद्या आहेत. कयाधू नदीच्या परिसरात २४ गावे येत असून पैनगंगा नदीच्या काठी १९ गावे येतात. तसेच १९ गावांच्या परिसरातून पूर्णा नदी वाहते. शिवाय १० गावाच्या परिसरातून छोट्या नदी व नाले वाहतात. त्यामुळे जिल्ह्यातील ७० गावे पूर प्रवण क्षेत्रात येतात. जास्त पाऊस झाल्यास या गावांना पुराचा धोका असतो.
हिंगोली शहरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण
हिंगोली शहरात पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेने साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. औंढा रोडवरील नाल्यातील गाळ काही दिवसांपूर्वीच काढला असून नाला वाहता करण्यात आला आहे.
हिंगाेली शहरात १३५ धोकादायक इमारती मालकांसह कयाधू नदीच्या पूररेषेत मोडणाऱ्या ७६० घरांनाही नोटीस देण्यात आले आहे.
मान्सून पूर्व तयारीसंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही जय्यत तयारी केली आहे. आपतीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबत पत्रके, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
-रोहित कंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी