हिंगोली : समोरून एक्स्प्रेस येत आहे आणि एक भोळसर व्यक्ती रुळावरून आरामात चालत येत आहे. त्याला बाजूला होण्यासाठी आवाज देऊन, इशारे करून काहीच लक्षात येत नव्हते. हे चित्र पाहून सर्वांचा जीव टांगणीला लागला मात्र, आणीबाणीची स्थिती ओळखत तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याने जीवाची बाजी लावत पळत जात त्या भोळसर व्यक्तीला तेथून बाजूला केले क्षणार्धात त्याचे प्राण वाचले.
खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे गेटवर नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असल्याने येथे वाहतूक शाखेतर्फे एका पोलीस कर्मचा-याची नियुक्ती केली आहे. ११ डिसेंबर रोजी येथे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी गजानन ढाले कार्यरत होते. साडे अकराची वेळ होती अकोल्याकडून नांदेडकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे स्थानकातून सुटली होती. याच दरम्यान १ क्रमांकाच्या रेल्वे गेटापासून काही अंतरावर एक भोळसर व्यक्ती त्याच्याच नांदात रुळाच्या मधोमध रेल्वेस्टशन मार्गे चालत येत होता.
हे चित्र पासून गेटवर थांबलेल्या सर्वांच्या नजरा त्याच्याकडे एकटक्क लागल्या होत्या. अनेकजण त्याला आवाजही देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याचे कोणाकडेही लक्ष नव्हते. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस कर्मचारी गजानन ढाले यांनी कसलाही विचार न करता त्या व्यक्तीकडे धाव घेतली. प्राणाची बाजी लावत ढाले त्याच्यापर्यंत पोहोंचले व त्याला बाजूला ढकलत स्वतःही बाजूस उडी घेतली. त्याच क्षणी वा-याच्या वेगाने रेल्वे त्या रुळावरून पुढे निघून गेली. रेल्वे जाताच दोघेही सुखरुप दिसल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
मी माझे कर्तव्य केले रेल्वे रुळाच्या खडीवरुन धावताना पाय घसरत होते. मात्र, माझा वेग कमी झाला तर तो प्राणास मुकणार हे मनात येत होते. यामुळे कसलीच पर्वा न करता त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. संकट काळात मदतीसाठी धावून जाणे हेच खरे पोलीसांचे कर्तव्य आहे.
- गजानन ढाले, पोलीस कर्मचारी