कळमनुरी: मक्का-मदीना (सौदी अरेबिया) येथे उमराहला घेऊन जातो असे म्हणून हैदराबाद येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या तिघांनी कळमनुरी येथील 41 जणांना 26 लाख 65 हजाराने गंडविल्याची उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कळमनुरी येथील शेख.शाकीर यांच्या फिर्यादीवरून हैदराबाद येथील येथील टूर्स ट्रॅव्हल्सचे मालक म.वाजेद, म.अ.रहेमान, म.ताहेर या तिघांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी फिर्यादी व इतर 41 यात्रेकरूंना मक्का मदीना (सौदी अरेबिया) येथे उमराहसाठी घेऊन जाण्याचा 10 नोव्हेंबर 2022 रोजी करार केला.
दरम्यान, तिघांनी 41 यात्रेकरूकडून प्रत्येकी 65 हजार रुपये जमा केले. एकूण 26 लाख 65 हजार रुपये जमा झाल्यानंतर तिघांनी प्रतिसाद देण्याचे बंद केले. यामुळे यात्रेकरूंनी पैसे मागितले असता आरोपींनी पैसे देखील दिले नाही. कराराचे पालन न करून फसवणूक केल्याने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी विजय रामोड हे करीत आहेत.