लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी जुन्या कामांचा आढावा घेतला असता फारसी सुधारणा झाल्याचे चित्र दिसत नव्हते. निदान २0१४ पर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण करण्याचे नियोजन करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले. त्यामुळे एका ठरावीक काळापर्यंतची रखडलेली कामे तरी पूर्ण होतील. दोन दिवसांत नियोजन सादर करण्यास सांगितले. सिंचन विहिरींची कामेही पुन्हा आहे त्याच परिस्थितीत दिसत आहेत. यात एकूण २९८७ कामे सुरू असून पूर्ण झालेली कामे ५६४ आहेत. त्यामुळे वसमतमध्ये तर मागच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचेही पालन झाले नसल्याने गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले. जिओ टॅगिंग, जॉब कार्ड व्हेरिफिकेशनमध्ये प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढ झाली. तर वेळेत मजुरी अदा करण्याची परिस्थितीही सुधारली आहे. तेवढीच समाधानाची बाब आहे.जिल्ह्यातील ३0 गावांमध्ये आतापर्यंत एकही मग्रारोहयोचे काम झाले नाही. अशा ग्रामपंचायतींत कामे सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगण्यात आले. यात औंढा तालुक्यातील ३, वसमत-९, हिंगोली-७, कळमनुरी-४, सेनगाव-७ अशी स्थिती आहे. पालकमंत्री पाणंद रस्त्याची १४ कामे सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यात वसमत-३, हिंगोली-१, सेनगाव-३, औंढा-१ व कळमनुरीत ६ कामे सुरू झाली आहेत.
मग्रारोहयोत पहिले पाढे पंचावन्नच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:28 AM