ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 25 - डिग्रसवाणी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या १.९0 लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
डिग्रस वाणी येथील शेत गट क्र.२२३ मध्ये मग्रारोहयोत प्रत्यक्ष मजुरांमार्फत विहीर झालेली नसताना बनावट हजेरीपट तयार करून त्यावरील मजुरांच्या नावे खोटी मोजमापपुस्तिका तयार करून मजुरीच्या रक्कमा उचलल्याचा आरोप करण्यात आला होता. यात तत्कालीन सरपंच मधुकर गणपत खंदारे, ग्रामसेवक तथा आताचे औंढ्याचे विस्तार अधिकारी भीमराव संभाजी धुळे, ग्रामरोजगार सेवक संतोष भिवाजी खंदारे, पालक तांत्रिक अधिकारी तथा पाणीपुरवठा अभियंता अ.बारी अजगर खान, आता सेनगाव पं.स.त असलेले कृषी अधिकारी पंकज राठोड यांनी संगनमत करून एकमेकांना सहकार्य करीत शासनाच्या १.९0 लाखांच्या रकमेचा अपहार केला.
तर सरपंचाचा मुलगा राहुल मधुकर खंदारे याने यात संबंधितांना सहकार्य केले. त्यामुळे या सर्वांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमनासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्यासह पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, कर्मचारी आढाव, कांदे, शेख उमर, पंडितकर, दुमाने, कबाडे, उपरे, शेख जमीर आदींनी यातील पंकज राठोड वगळता इतर सर्व आरोपींना अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे गेली होती तक्रार
या प्रकरणात तक्रारदार श्याम शेवाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. हिंगोली उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्याकडे याचा पदभार देण्यात आला होता. या प्रकरणात २00८ ते २0१२ या कालावधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले होते. त्यापैकी एका प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. आता अजून बराच पल्ला बाकी आहे. यात अनेक अधिकारी, कर्मचारी, सरपंच गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.