शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराज यांच्या यात्रेत शुक्रवार १७ जानेवारी रोजी १०० क्विंटल भाजीच्या प्रसादासाठी हजारोंच्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सारंगस्वामी यात्रेत या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर पोचले असल्याने भाजीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक-भक्त येथे सहभागी झाले होते. या वर्षी १०० क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता.
शिरडशहापूर येथे विरशैव बांधवांचे आराध्यदैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखले जाते. येथे अनेक वषार्पासून दरवर्षी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होते. या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. यात्रेत आलेल्या भाविकांनी सोबत पोळ्या घेऊन आले होते. या ठिकाणी तयार केलेल्या भाजीचा प्रसाद घेऊन भोजन केले .तसेच अनेक भाविक भाजीचा प्रसाद घरी घेऊन गेले. येथे परिसरातील भाविक गाडी बैलाने डोक्यावर शेतातील भाजीपाला घेऊन आले होते. यात टोमॅटो ,वांगी ,चवळी, दोडके, पालक, शेपू, मेथी ,करडी, पानकोबी ,फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची ,गांजर ,काकडी, मुळा, कांदे, ऊस आदी प्रकारच्या १०० क्विंटल भाज्याचा यात समावेश होता. त्या सर्व भाज्या कढईत मिसळून त्यात गोडतेल, मसाला टाकून फोडणी दिल्यानंतर भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला. या भाजी प्रसादाचे भाविकांना नंतर वाटप करण्यात आले. यात्रेसाठी चारचाकी दुचाकी, तीन चाकी वाहने तसेच पायदळ देखील भाविक मोठ्या संख्येने आले होते. यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बसची व्यवस्था केली होती.
या यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानासह धार्मिक पुस्तके, धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आले होते. वीरशैव समाज बांधव शिरडशहापुर, सारंगवाडी, गवळेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी भाजीच्या प्रसादासाठी पुढाकार घेतला होता. भाजीप्रसाद यात्रेसाठी परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद , जालना जिल्ह्यासह आंध्रप्रदेश कर्नाटक व मराठवाड्यातील भाविक भाजीच्या प्रसादासाठी हजारोच्या संख्येने दाखल झाले. यात्रेमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टिने पोलीस प्रशासनातर्फे व महसूल प्रशासनाच्यावतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, तहसीलदार सचिन जोशी, तलाठी मंडळाअधिकारी, कोतवाल आदी उपस्थित होते.