हिंगोली : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आली आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांचे कार्यकर्ते अजूनही आपला वेगळा झेंडा घेऊन फिरत असल्याने महाविकास आघाडी कुठेच दिसत नाही. शेवटी पुढाऱ्यांनाही कार्यकर्त्यांच्या इच्छा, आकांक्षांच्या पुढे जाता येत नसल्याने नाइलाजाने त्यांच्या कलाने घ्यावे लागते.
हिंगोली जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. ही संख्या ७४ वर आहे. याशिवाय काही ठिकाणी तर एक दोन जागांसाठीच निवडणूक होत आहे. बिनविरोधसाठी अडचणी आणण्यापेक्षा गावात आमच्याही पक्षाचे प्राबल्य आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये झुंज रंगली आहे. अनेक पुढाऱ्यांनी गाव पातळीवर सलोख्यासाठी एकत्रित येऊन बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले होत. मात्र, कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतूनच पुढच्या जि.प. व पं.स.चा प्रवास सुकर करण्याची संधी असते. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणे अथवा आपल्या गटाचे पॅनल उभे करतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या, तरीही पक्षीय कार्यकर्तेच पॅनलच्या माध्यमातून आपापले वर्चस्व सिद्ध करतात. कुठे काँग्रेस तर कुठे सेना वरचढ आहे. कुठे राष्ट्रवादी तर कुठे भाजप वरचढ आहे. सध्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्येही विविध पक्ष आपापल्या गटाच्या कोणत्या ग्रामपंचायती आहेत, याचे दावे करीत आहेत. मात्र, जेथे निवडणुका होत आहेत, तेथेही अनेक ठिकाणी आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारावी, यासाठी नेतेमंडळी मार्गदर्शन करताना दितस आहे.
कार्यकर्त्यांमुळे नेते व नेत्यांमुळे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असली तरीही शिवसेनेशी नव्हती. आता राज्यात आघाडी असली तरीही गावपातळीवर विधानसभेतील लढतीच्या वचप्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या वचप्याच्या नादात मित्रपक्षच एकमेकांविरुद्ध उभे असल्याचे चित्र अनेक गावांत आहे. त्यात कुठे नेते तर कुठे कार्यकर्ते जोर लावताना दिसत आहेत.
गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसते. मात्र, पक्षीय कार्यकर्तेच लढतात. त्यात गावनिहाय वेगळी स्थिती असते. त्यामुळे आघाडी करणे शक्य नसते. काँग्रेसच्या ताब्यातही अनेक ग्रामपंचायती आल्या निवडणुकीनंतर आम्हीच सरस असल्याचे दिसून येईल.
- संजय बोंढारे,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारी निवडणूक आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक गावांत निवडणूक लढत आहेत. आघाडी केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यामुळे त्यांच्यावरच निर्णय सोपवून जास्तीत जास्त ग्रा.पं. ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे.
- दिलीप चव्हाण,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेनेने बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व सिद्ध केले. गाव तेथे शाखा व शिवसैनिकांचे जाळे आहे. त्यामुळे राज्यात आघाडी असली तरीही गावात ती शक्य नाही. तर पक्षाकडूनही तसे काही धोरण नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी लढत देत बाजी मारू.
- आ. संतोष बांगर,
जिल्हाप्रमुख, शिवसेना
निकालानंतरही अडचणच
अनेक ठिकाणी मित्रपक्षांतच लढती होत आहेत. काही भागांतच भाजपशी लढा होत असल्याने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीत निवडणुकीनंतरही अनेक गावांत सलगीची चिन्हे दिसत नाहीत. काही ठिकाणी तर मित्रपक्षातील काही कार्यकर्ते भाजपच्या सोबत पॅनलमध्ये असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे गावपातळीवर आघाडी, बिघाडीचा काहीच संबंध नसल्याचेच चित्र अनेक ठिकाणी आहे.