शिरड शहापूर (जि. हिंगोली): येथून जवळच असलेल्या सारंगवाडी येथे संतश्रेष्ठ सारंग स्वामी महाराज यांच्या यात्रेनिमित्त १७ जानेवारी रोजी १२५ क्विंटल भाजी व २० क्विंटल पोळी महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील गावोगावच्या दिंड्या यात्रेच्या निमित्ताने दाखल झाल्या होत्या. रांगेत उभे राहून भाविकांनी प्रसाद घेतला.
संतश्रेष्ठ सारंग स्वामी यात्रेच्या निमित्ताने १० जानेवारीपासून अखंड शिवनाम सप्ताह व परमहस्य ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. १६ जानेवारी रोजी थोरला मठ संस्थान वसमत व गिरगाव तसेच सातेफळ, वस्सा, हयातनगर, फुलकळस, पिंपराळा, सेलू, कुरुंदवाडी, ताडकळस आदी गावांतील जवळपास २५ ते ३० दिंड्या पदयात्रेने गावात दाखल झाल्या होत्या. सर्व दिंड्यांचे वीरशैव समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यात्रेच्या निमित्ताने दिंड्या घेऊन आलेल्या सर्व भाविकांची यात्रा कमिटीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी काही दिंड्या सारंगवाडी येथे दाखल झाल्या होत्या. सोमवारी रात्री पालखी मिरवणूक सारंगवाडी येथील मठात दाखल झाली. यावेळी पुरुष भजनी व महिला भजनी मंडळींनी सहभाग घेतला.
१७ जानेवारी रोजी सकाळी ‘श्रीं’च्या समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर हभप वाखारीकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर धर्मसभा घेण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांना भाजी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यात्रेतील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त कमिटी मठ संस्थान, वीरशैव समाज व गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
कोरोनाकाळात बंद होता महाप्रसाद...कोरोनाच्या काळात दोन वर्षे शासनाच्या सूचनेनुसार येथील भाजी महाप्रसाद बंद ठेवण्यात आला होता. यावेळेस कोरोना संपुष्टात आल्यामुळे गावोगावचे भाविक सारंगवाडी येथे दाखल झाले होते. दिंड्यांसोबत भाविकांनी वेगवेगळ्या भाज्या आणल्या होत्या. दिंड्या उतरल्यानंतर भाजी मठ संस्थानच्या स्वाधीन केली.
पोलिस बंदोबस्त चोख...दोन वर्षांनंतर यात्रा भरत असून, भाजीचा महाप्रसाद होणार आहे, हे पाहून पोलिस प्रशासनाने यात्रेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रेदरम्यान आलेल्या दुचाकी व चारचाकींसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था केली होती. भाविकांनी रांगेत उभे राहून सारंग स्वामी यांचे दर्शन घेत भाजी प्रसाद घेतला.