- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) - मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने चौकशी केली असता ३ बॅगा पैशाने भरलेल्या आढळून आल्या. यामध्ये जवळपास १ कोटी रुपये असल्याचे आढळून आले असून या पैशाची मोजदाद सुरु आहे. ही ट्रॅव्हल्स मुंबईवरुन येत होती. परंतु कुठे जात होती? हे मात्र अजून तरी कळाले नाही.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन व पोलिस प्रशासनाने तपासणी सुरु केली असून नियमांचे पालन करा, अशा सूचनाही देत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान वसमत तालुक्यातील चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यावेळी त्यामध्ये १ कोटी रुपये आढळले. यानंतर पथकाने ट्रॅव्हल्स पोलिस राहोटीच्या बाजूला लावली आणि पैशाची मोजदाद करणे सुरु केले आहे.
ट्रॅव्हल्समध्ये सापडल्या तीन बॅगा...निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पोलिस व निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. आज रविवारचा दिवस असला तरी सर्वच अधिकारी कर्तव्यावर आहेत. मुंबईवरुन आलेली ट्रॅव्हल्स चिखलीफाटा येथे थांबविली व त्याची कसून चौकशी केली. या दरम्यान तीन मोठ्या बॅगा सापडल्या आहेत.
माहिती कळताच पोलिस तत्परतेने दाखल...मुंबईवरुन आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये तीन बॅगा सापडल्याची माहिती चिखलीफाटा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना दिली. यानंतर लगेच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, महसूल विभागाचे अधिकारी व स्थिर निगराणी पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.