सेनगाव ( हिंगोली ) : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान जाळपोळीच्या घटना शहरात घडल्या होत्या. याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे शहरात तणाव असून आजही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र बंदला शहरात हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी दोन वाहने व पंचायत समितीच्या गोदामाला आग लावली. यावेळी पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर शहरात रात्री उशिरापर्यंत तणावाची स्थिती होती. या प्रकरणी पोलीसांनी अकरा आंदोलाकांविरोधात जाळपोळ करणे, शासकीय कामात अडथळा, रस्ता अडविणे आदी कारणावरून गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या मध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, निखिल पानपट्टे, हेमंत सघंई, अमोल तिडके, प्रविण महाजन, अनिल गिते, दत्ता देशमुख, जगदीश गाढवे, पढरी गव्हाणे आदींचा समावेश आहे.तसेच स्कूल बस जाळल्या प्रकरणात अज्ञात चार ते पाच जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आजसुद्धा शहरात बंद पाळण्यात आला. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीसांनी व्यापारी वर्गाला दुकाने उघडणाचे आवाहन केले. पंरतु व्यापारानी दुकाने मात्र उघडली नाहीत.
दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सातव्या दिवशीही कायम आहे. पोलिसांना परिस्थिती नियत्रंणात ठेवण्यात अपयश आल्याने आंदोलनास गालबोट लागल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.