औरंगाबाद : जिल्ह्यात फुलंब्री आणि गंगापूर वगळता शिवसेना-भाजप उमेदवारांच्या विरोधात नाराज झालेल्या बंडखोरांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातील किती बंडखोर माघार घेणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होईल; परंतु रविवारी दिवसभर बंडखोरांच्या मागे उमेदवारांचे ‘दूत’ धावत होते.
युतीतील बंडखोरांपैकी माघार कोणत्या पक्षाच्या बंडखोराने आधी घ्यावी, यावरून दिवसभर खल झाला. रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे सोमवारी पुन्हा उमेदवारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बंडखोरांची खुशामत करावी लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झालेली बंडखोरी थोपविण्यात यश आल्याची चर्चा रविवारी होती; परंतु जोपर्यंत अर्ज मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकते.
पैठण आणि गंगापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे, तर सिल्लोड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शिवाय प्रचारातूनही अंग काढून घेतले आहे. त्यामुळे तेथे शिवेसना उमेदवाराची कोंडी झाली आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब गायकवाड, राजू शिंदे यांनी शिवसेना उमेदवार आ. संजय शिरसाट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना आ. प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे.
वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपचे एकनाथ जाधव, दिनेश परदेशी यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे.
कन्नड मतदारसंघात भाजपचे संजय गव्हाणे यांनी शिवसेना उमेदवार उदय राजपूत यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.
उमेदवार होते चिंतितबंडखोरांना थोपविण्यात दिवसभर यश आले नाही. मात्र, रात्री उशिरानंतर काही पर्यायांवर चर्चा करून बंडखोरांना थोपविण्यासाठी उमेदवारांनी तयारी केली होती. दिवसभर युतीचे उमेदवार चिंतित दिसत होते. बंडखोर माघार घेतील, असा दावा युतीतील उमेदवारांनी केला. पक्षप्रमुख, प्रदेशाध्यक्षांकडून आदेश आल्यानंतर किंवा एखादे लाभाचे पद देण्याच्या आश्वासनावर बंडखोर माघार घेतील, असा विश्वास उमेदवारांना आहे.
दरम्यान, वैद्य, तनवाणी, शिंदे, गायकवाड, परदेशी यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत रविवारी काही निर्णय घेतला नाही. तनवाणी दिवसभर समर्थकांच्या बैठकीत होते. शिंदे यांना फुलंब्रीतून माघार घेण्यासाठी बोलावणे आले होते. दरम्यान, रमेश गायकवाड यांच्या अर्जाबाबत न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गायकवाड हे रविवारी दिवसभर भाजपमधील एका बंडखोर नातेवाईकाच्या संपर्कात होते.