हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:04 PM2020-01-15T19:04:36+5:302020-01-15T19:06:58+5:30
आज सभापती निवडीतही शिवसेनेने काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज भरला.
हिंगोली : महाविकास आघाडीला हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे नवखे आ. संतोष बांगर यांनी सुरुंग लावत अनुभवी व दिग्गज असलेल्या जयप्रकाश दांडेगावकर आणि राजीव सातव यांना राजकीय मात दिली. शिवसेनेने एक जास्तीचे सभापतीपद बळकावत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बंडखोरांना सभापतीपदी विराजमान करण्यात मोलाची भूमिका बजावली.
हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १0, भाजप ११ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या एका सदस्याचे पद अनर्ह ठरलेले आहे. महाविकास आघाडीच्या बोलणीनुसार सेनेला अध्यक्ष व महिला बालकल्याण, राकाँला उपाध्यक्ष व कृषी तर काँग्रेसला शिक्षण व समाजकल्याण ही पदे ठरली होती. उपाध्यक्षाची निवड करतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांच्या पाठीमागे बळ उभे केल्याने पक्षाला यशोदा दराडे यांना माघार घेण्यास सांगावे लागले.
आज सभापती निवडीतही शिवसेनेने काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज भरला. राजीव सातव गटाला बाहेर ठेवण्याचा डाव आखला होता. यात यशही आले. सेनेचे फकिरा मुंढे हे ४३ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे डॉ. सतीश पाचपुते यांना अवघी ८ मते मिळाली. तर सेनेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी इतर कुणाचाच अर्ज नसल्याने रुपाली पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. इतर दोन सभापतीपदांसाठी राष्ट्रवादीने यशोदा दराडे तर काँग्रेसने कैलास सोळुंके यांच्या नावे व्हिप दिला होता. मात्र सेना व भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांनी ३५ तर शिवसेना, राष्ट्रवादीचा फुटीर गट, अपक्ष व भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाच्या भरवशावर २४ मते घेत काँगे्रसचे बंडखोर बाजीराव जुमडे यांनी विजयश्री खेचली. सातव गटाचे कैलास सोळुंके यांना ऐनवेळी भाजपच्या ११ मतांची साथ लाभल्याने ते १८ मतांवर गेले. मात्र मतदानात एवढी फाटाफूट झाली की महाविकास आघाडीतील एका पक्षाचा ताळमेळ दुसऱ्याला नव्हता.