बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार
By विजय पाटील | Published: June 28, 2024 04:49 PM2024-06-28T16:49:23+5:302024-06-28T16:57:11+5:30
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
हिंगोली : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढल्यानतंर विजयाचा मार्ग सुकर झाला होता. थोड्याबहुत असलेल्या कुरबुरी आता मात्र वादात रुपांतरित होणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विरोधात काम केल्याची तक्रार खा.नागेश आष्टीकर यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. हिंगोली लोकसभेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र काँग्रेसला ही जागा सोडवून घेता आली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत अलिप्तवादी भूमिका घेतली हेाती. त्या प्रचार कार्यात सहभागी झाल्या नव्हत्या. लोकसभा निवडणूकही झाली. इंडिया आघाडीचे आष्टीकर निवडूनही आले. आता पुन्हा सातव यांचा कळमनुरी विधानसभेवर डोळा आहे. त्या काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याची मागणी करू लागल्या आहेत. तर तो न मिळाल्यास अपक्षही उभ्या राहू शकतील, अशी चर्चा रंगत आहे. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या. कळमनुरीत डझनभर नेते असतानाही सक्रिय नसल्यासारखी वाटणारी शिवसेना अतिशय आक्रमकपणे पुढे येत आहे. मात्र या मार्गात सातव यांचा अडसर होवू नये, यासाठी आता खा.आष्टीकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.
खा.आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या विरोधात थेट पक्षाच्या सरचिटणीसांकडे तक्रार केली आहे. सातव यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विरोधात भूमिका घेत इंडिया आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप केला. सातव यांनी काँग्रेस पक्षाचे निर्देश डावलून वंचित बहुजन आघाडी व महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. सातव यांच्या या भूमिकेमुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शिवाय सातव यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून इंडिया आघाडीच धर्म टिकविण्यासाठी शिस्तविषयक कारवाईची मागणी केली