हिंगोली : महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.
वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगाने वर्दळीत बाजाराच्या ठिकाणी महावितरणच्या वीजतारांचा गुंता सर्वांनाच माहित आहे. अनेकदा वीजतारांचे घर्षण होऊन आगीच्या दुर्घटना घडतात. शिवाय पावसामुळेही वारंवार बिघाड होतो. आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबावरील वीजतारा नागरिकांना दिसणार नाहीत.
हिंगोली शहर सुशोभिकरणच्या दृष्टिकोनातून व गर्दीच्या ठिकाणी वीजतारा उघड्या राहू नयेत, यासाठी आता हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे येत्या पंधरा दिवसांत सुरू केले जाणार आहे. सदर कामासाठी लागणारी परवानगी, सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच महावितरण व नगरपालिका हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार आहे.
वीजपुरवठा सुरळीतसाठी विद्युत उपकेंद्र; ३ कोटी खर्चहिंगोली शहरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरठा खंडितपासून हिंगोलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. शहरात वीजपुवठा सुरळीत व्हावा यासाठी आता महावितरणने नवीन ३३ के व्ही विद्युत उपकेंद्र उभारले आहे. नवीन खाकीबाबा सबस्टेशनची काम पूर्ण झाले आहे. रेल्वे पटरीच्या पलीकडील विजेचा दाब आता कमी आदर्श महाविद्यालयाजवळील उपकेंद्रावर असेल. तर रेल्वेपटरी अलीकडील शहराचा भाग महावितरणच्या कार्यालयातील खाकीबाबा ३३ केव्ही उपकेंद्रावर राहणार आहे. ३ कोटी रूपये खर्च करून सबस्टेशनचे कामकाज करण्यात आले.