आई आणि मुली, आज्जी अन नातवंड यांच्यातील प्रेमाला ताेड नसते. मुलगी विवाहित होऊन सासरी गेली तरी तिची ओढ माहेरच्या उंबरठ्याकडे असते. आईचीही माया अशीच असते. मुलगी परक्या घरात नांदायला गेली तरी लेकीची सतत आठवण येत असते. तिच्या सुख दुखाची विचारणा केली जाते. बच्चे कंपनींनाही मामाच्या गावाला जाता येत नसल्याने त्यांच्यातील उत्साह कमी झाला आहे. मात्र मागील वर्षभरापासून कोरोनामुळे यावर निर्बंध आले आहेत. जिल्हांतर्गंत प्रवास करायचा म्हटले तरी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून माय-लेकींना मोबाईलच्या माध्यमातून ख्याली खुशाली विचारावी लागत आहे. त्यामुळे आता कोरोना केव्हा संपेल, याची सर्वच वाट पाहत आहेत.
माझे माहेर माहेर...
माझे माहेर रिसोड आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून माहेराला जाता आले नाही. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे.
- पुजा मनोज काळे
वाशिम जिल्ह्यात माहेर आहे. कोरोनामुळे माहेराला जाता आले नाही. नातेवाईकांच्या लग्नालाही जाता आले नाही. ई-पासमुळे अडचण निर्माण होत आहे.
- मनिषा दिनेश पठाडे
कोरोनामुळे माहेराला जाता येत नाही. माहेराला यवतमाळ जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास लागत आहे. त्यामुळे मोबाईलवरूनच आई-बाबांशी बोलत असते. कोरोना कधी संपेल याची वाट पाहत आहे.
- रश्मी राहूल वाढवे
लागली लेकीची ओढ
कोरोनामुळे वर्षभरापासून मुलीला बघता आले नाही. मुलीला माहेरी बोलावणे पाठविले आहे. मात्र कोरोनामुळे येता आले नाही. त्यामुळे फोनवरूनच ख्याली खुशाली घेत आहे.
- नंदा कान्हेड
दरवर्षी मुलगी उन्हाळ्यात माहेरी येते. मात्र आता कोरोनामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. त्यामुळे मोबाईलवरूनच तिच्या तब्येतीची चौकशी करावी लागत आहे.
- सुमन इंगोले
कोरोनामुळे नातेवाईकांच्या घरीही जाता येत नाही. मुलीला लहान मुले असल्याने कोरोनाच्या भीतीने माहेरी बोलावताही येत नाही. त्यामुळे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनच ख्याली खुशाली विचारत असते.
- रंजना पाईकराव
मामाच्या गावाला जायला कधी मिळणार ?
दरवर्षी मामाच्या गावाला नागपूर येथे जात असतो. मागील वर्षीपासून मामाच्या गावी जाता आले नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील धमाल, मस्ती करता आली नाही.
- तन्मय सोनटक्के
कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने घराबाहेर पडण्यास आई-बाबांनी निर्बंध घातले आहेत. मामाच्या गावातही रूग्ण आढळून येत असल्याने मामाच्या गावी पाठविले जात नाही. कोरोना केव्हा संपणार याची वाट बघतोय.
- वेदांत गंगावणे
कोरोनामुळे शाळेतही जाता आले नाही अन् मामाच्या गावीही. वर्षभरापासून मामाच्या गावी जाण्यासाठी बाबांना तगादा लावत आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नसल्याने घरीच थांबावे लागत आहे.
- कपिल इंगळे