हिंगोली : राज्यातील काही जिल्ह्यांत रेशन दुकानावर गहू, तांदूळसह मका व ज्वारी देण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र रेशनवर मका, ज्वारी देण्याचा सध्या कोणताही विचार नाही. जिल्ह्यात प्रमुख पीक म्हणून मका घेतले जात नसून, तशी मागणीही लाभार्थींकडून नसल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
शासनाच्या वतीने रेशन दुकानदारामार्फत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थींना धान्य दिले जाते. यात प्राधान्य गटातील प्रतिव्यक्ती २ रुपये प्रमाणे तीन किलो गहू व ३ रुपयांप्रमाणे दोन किलो तांदूळ दिला जातो. तसेच अंत्योदय गटातील प्रति शिधापत्रिका २ रुपयांप्रमाणे २३ किलो गहू व ३ रुपयांप्रमाणे १२ किलो तांदूळ दिला जातो. जिल्ह्यात एकूण रेशन कार्डधारकांची संख्या १लाख ८८ हजार ८७३ असून यात अंत्योदयचे कार्ड २६ हजार ३५९, अन्न सुरक्षा कार्डधारक १ लाख ३१ हजार ८४८ तर शेतकरी कार्डधारकांची संख्या ३० हजार ७७६ आहे. राज्यभरातील काही जिल्ह्यात आता गहू, तांदळासह मका व ज्वारी देण्यात येत आहे. मका किंवा ज्वारी घ्यायची असल्यास गहू एक किलो कमी मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र अद्याप रेशन दुकानावर ज्वारी, मका देण्याचा कोणताही विचार नसल्याचे दिसून येत आहे. या भागात मका, ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात नाही. तसेच रेधन धान्य लाभार्थींमधूनही मका, ज्वारीची मागणी नाही. आपल्याइकडे मका कोणी खात नसल्यानेच मका व ज्वारीची मागणी केली नसल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
एक रुपयेप्रमाणे मका, ज्वारी
हिंगोली जिल्ह्यात रेशनवर मका, ज्वारी दिली जात नसली तरी इतर जिल्ह्यांत वाटप होत आहे. ज्या लाभार्थींना मका, ज्वारी पाहिजे, त्या त्यांना एक किलो गहू कमी वाटप होणार आहे. तसेच इतर जिल्ह्यांत रेशनवर एक रुपया किलोप्रमाणे मका, ज्वारी दिली जात असल्याचे काही लाभार्थी सांगत आहेत.
रेशनच्या दुकानावर ज्वारी, मका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, हे चांगले आहे. मात्र, आपल्या जिल्ह्यात सध्यातरी कोणी मका खात नाही. रेशनवर ज्वारी दिली तर चांगलेच आहे. तसेच बाजारात ज्वारी मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्वारीची भाकर शरीरासाठी पौष्टिक असते.
-सिकंदर पठाण
-
रेशन दुकानावर सध्या गहू, तांदूळ मिळत आहे. एकाही रेशन दुकानावर मका, ज्वारी वाटप केल्याची माहिती नाही. रेशनवर मकाऐवजी ज्वारी दिल्यास लाभार्थी घेतील. ज्वारी देण्याचा निर्णय चांगला आहे; परंतु गहू व तांदूळ कमी करू नये.
-ज्ञानेश्वर पातळे
- जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका- १८८८७३
अंत्योदय शिधापत्रिका - २६३२९
अन्न सुरक्षा कार्डधारक - १३१८३८
शेतकरी कार्डधारक - ३०७७६