लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोक चळवळीतून मृत नद्यांना पुनरज्जीवित करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थपणे यात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातील मृत नदीस पुनरज्जीवित करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे प्रतिपादन जलपुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी केले. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १५ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राजेश पुराणी, उमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव, डॉ. किशन लखमावार, मगर यांच्यासह जलप्रेमी उपस्थित होते. कयाधू नदी पुनरूज्जीवित संदर्भात कार्यशाळा मार्गदर्शनासाठी राजेंद्रसिंह राणा हिंगोलीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले राज्य सरकार आणि नागरीकांच्या सहभागातूनच कयाधू नदीला पुनरूज्जीवीत करता येणे शक्य आहे. यासाठी नदीवरील अतिक्रमण हटविणेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यामुळे पुढील कामे करता येतील. यामध्ये प्रशासनाची भुमिका महत्त्वाची आहे. नदी प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याला वेळीच आळा घालावा लागेल. यासाठी ज्या काही उपाय-योजना आहेत त्या कराव्या लागतील. जलसाक्षरता अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही ते म्हणाले. जलप्रदुषण करणाऱ्यांना जेलात पाठवू, अन् नदी पुनरूज्जीवित करू असे राणा यावेळी म्हणाले.जि. प. सभागृहात आयोजित कार्यशाळेत राणा यांनी कयाधू पुनरूज्जीवित संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.
लोकचळवळीतून नद्या जिवंत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:27 AM