लोकमत न्यूज नेटवर्कआंबा चोंढी : वसमत तालुक्यातील आंबा येथे स्वयंपाक करण्यासाठी गॅस चालू केल्यानंतर काही वेळातच रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाल्याची घटना रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.आंबा येथे मागील सहा महिन्यांपूर्वी प्रंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत सीता तुळशीराम नेव्हल या शेतमजुरी करणाऱ्या महिलेला नवीन गॅस कनेक्शन मिळाले. महालक्ष्मी सणानिमित्त सजावटीची आरास मांडल्यानंतर सदर महिलेने स्वंयपाक करण्यासाठी गॅस चालू केल्यानंतर थोड्या वेळाने रेग्युलेटरमधून गॅस गळती होवून आगीचा भडका उडाला; परंतु सुदैवाने गॅस टाकीचा स्फोट झाला नाही. परिसरातील ग्रामस्थ संकटसमयी धाऊन आले व आगीवर नियंत्रण मिळविले. थोड्या वेळानंतर तेथे पाहणी केली असता गॅस टाकीचे रेग्युलेटर खराब झाल्यामुळे आग भडकल्याचे लक्षात आले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. गॅसचे रेग्युलेटर खराब असतानाही ते लावले गेल्याने सदरील घटना घडली आहे. वितरकांनी रेग्युलेटर चांगले असल्याची खात्री करूनच वितरित करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.
आंबा येथे गॅस टाकीचा भडका; रेग्युलेटरमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:12 AM