पुणे येथील कशिश फाउंडेशनच्या डॉ. प्राजक्ता शहा, डॉ.प्रेरणा कालेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून स्पर्धा आयोजित केली होती. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते समीर धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे २०० पेक्षा अधिक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत ४० महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. त्यांचे सामाजिक कार्य, व्यक्तिमत्त्व याशिवाय इतर निकष पाहण्यात आले. त्यानंतर, रॅम्पवॉक केल्यानंतर त्यांना प्रश्नही विचारण्यात आले. यामध्ये डॉ. मनीषा यांना तुम्हाला एक दिवसासाठी देव केल्यास तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी यावर दिलेले उत्तरच त्यांना विजयी करून केले. कोरोनाचा संदर्भ देत त्यांनी आजही माणुसकी जिवंत असल्याचे म्हटले. एकमेकांना मदत करून त्याचा प्रत्यय अनेकांनी दिला. प्रत्येक माणसांमध्ये माणुसकी रुजविणार तसेच षडरिपूंचे दमन करून निसर्गाला अभिप्रेत असलेला माणूस निर्माण करणार असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर मिसेस मेडिक्वीन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांना मानाचा मुकुट, प्रमाणपत्र देण्यात आले. हा किताब डॉ. मनीषा यांना मिळाल्याने हिंगोलीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनीषा राठोड ठरल्या मिसेस मेडिक्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:24 AM