हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील डिग्रस फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज (दि.७ डिसेंबर) दुपारी १ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी सकाळपासून हिंगोलीसह परजिल्ह्यातून समाजबांधव दाखल होत आहेत. त्यामुळे सकाळी १०:३० वाजताच सभास्थळी मोठी गर्दी झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची सभा तब्बल ११० एकरावर होणार असून, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील पंधरवड्यापासून या सभेची तयार करण्यात येत होती. ६ डिसेंबर रोजी सभेची तयारी पूर्ण झाली. सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांची गैरसोय होवू नये याकरीता तब्बल ६ हजार स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या विविध ठिकाणी नियुक्ती केली आहे. सभेच्या आदल्या दिवशी रात्रीच जवळपास पंधरा ते वीस हजारांवर समाजबांधव सभास्थळी जमले होते. तर आज सकाळपासून शहरांसह ग्रामीण भागातून तसेच परजिल्ह्यातून समाजबांधव सभास्थळाकडे येत आहेत. दुचाकी, ट्रॅक्टर, पीकअप तसेच विविध वाहनांतून समाजबांधव दाखल होत आहेत.
दरम्यान, सभास्थळी समाजाबांधव लाखोंच्या संख्येने जमणार असल्याने या ठिकाणी आरोग्य तत्पर ठेवण्यात आली आहे. जवळपास चारशे डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची फौज सभास्थळी सकाळपासून दाखल झाली आहे.