- अरुण चव्हाणजवळाबाजार (जि. हिंगोली) : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. या कारणामुळे वसमत तालुक्यातील गुंडा येथील ३३ वर्षीय युवकाने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २९ जुलै रोजी रात्री घडली.
एकनाथ भगवान चव्हाण असे युवकाचे नाव असून, तो मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून अनेक दिवसांपासून नैराश्येत होता. मराठा समाज उच्च शिक्षित असूनही समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे समाजाचे युवक मोलमजुरी करीत आहेत. शिक्षण घेऊन तरी काय उपयोग, असे म्हणून युवकाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.
एकनाथ चव्हाण याच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच हट्टा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी जमादार दत्तात्रय कावरखे, प्रफुल्ल आडे, महेश भारशकंर आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.