हिंगोली: वेळोवेळी मागणी करुनही मराठा समाजाला कित्येक वर्षापासून आरक्षण नाही. यामुळे तर मी शिक्षणपासून दूर राहिलो आहे. आंदोलने करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशी चिठ्ठी लिहून आरक्षण हा प्रश्न सतावत होता, असे म्हटले आहे. याच विवंचनेत नहाद (ता. वसमत) येथील तरुणाने परिसरातील विहिरीत उडीद घेऊन बुधवारी आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कळताच हट्टा पोलिसांनी घटनास्थळी जावून भेट देत पंचनामा करणे सुरु केले.
१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान नहाद परिसरातील एका विहिरीत गोविंद सोनाजी कावळे (वय २१) या तरुणाने मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना कळताच नातेवाईकांनी हट्टा पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर लगेच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे हे आपल्या कर्मचाऱ्यांनी घेऊन नहाद येथे पोहोचले. घटनास्थळी वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी भेट दिली. याबाबतची माहिती शासनाला कळविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तरूणाच्या पश्चात आजोबा, वडील, आई, एक भाऊ असा परिवार आहे.
शासनाचा प्रतिनिधी येईपर्यंत मृतदेह देणार नाही...मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही ही मागणी करुन एका २१ वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली. यामुळे नहाद गावावर शोककळा पसरली आहे. जोपर्यंत शासनाचे अधिकारी येत नाहीत. तोपर्यंत तरुणाचा मृतदेह येथून हलविले जाणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी घटनास्थळी भेट देवून गावकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर गावकऱ्यांनी पार्थिव उचलले.