हिंगोली : मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान संतप्त आंदोलकांनी हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे बासंबा पोलीस ठाण्याची जीप पेटविली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून बंद यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू होती. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. हिंगोली शहरात बंदला प्रतिसाद मिळाला. तर तालुक्यात हिंगोली-नांदेड मार्गावरील खानापूर व सावरखेडा या दोन ठिकाणी टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले. तर सावरखेडा येथे रस्त्यावर बाभळीचे झाड तोडून टाकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आडगाव मुटकुळे येथेही कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजेपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
शिवाय वसमत येथे सकाळी १० वाजता मोर्चा काढण्याची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू होती. वसमत येथेही बंदमध्ये मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. वसमत तालुक्यातील आसेगाव येथे बस बंद केल्या होत्या. तर कुरुंदा येथे बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. तर चोंढी रेल्वे स्टेशन येथेही मराठा कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी केला. कळमनुरीसह तालुक्यात मोठी बाजारपेठ असलेल्या आखाडा बाळापूर, वारंगा फाटा येथेही दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला.
आखाडा बाळापूर येथे मराठा आमदारांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा उपरोधिक उपक्रम कार्यकर्त्यांनी केला.रस्त्यावर ठिय्या मारल्याने दीड तास राष्ट्रीय महामार्ग बंद होता तर शेवाळा चौकात आरक्षण समर्थकांची सभा व भाषणे झाली. डोंगरकडा येथील कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद पाळून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा फाटा येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. कळमनुरी येथे मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एसटी पाठक यांना देण्यात आले. औंढा नागनाथ येथेह बंद पुकारला असून प्रशासनास निवेदन दिले. तर तालुक्यातील जवळाबाजार येथेही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.