हिंगोली : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणार्थिंवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने २ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवित ४ सप्टेंबर रोजी जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्यावतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे उपोषणार्थिंवर लाठीमार झाला. या घटनेचा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच ४ सप्टेंबर रोजी जिल्हाबंदची हाक देण्यात आली आहे. निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यात मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे, घटनेची सखोल चौकधी करून जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निलंबीत करून दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, घटनेची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागण्या करण्यात आल्या. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.
गोरेगावात टायर पेटवून निषेध...सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात कनेरगाव नाका ते जिंतूर मार्गावर २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास टायर जाळून जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. रस्त्यावर टायर जाळण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.
३ सप्टेंबर रोजी गोरेगाव बंद...मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ ३ सप्टेंबर रोजी गोरेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.