वसमत : हिंगोलीहून वसमतकडे येत असताना भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ जलसंपदामंत्री मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनांचा ताफा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानक अडवला. यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जयंत पाटील यांना दिले. आज दुपारी झालेल्या या आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्व कल्पना नव्हती. त्यामुळे ताफा अडवताच चांगलाच गोंधळ उडाला होता. ( Activists of Sambhaji Brigade blocked the convoy of Jayant Patil and Dhananjay Munde)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोलीहून वसमतकडे नियोजित कार्यक्रमासाठी येत होता. यावेळी भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अचानक ताफ्यासमोर येऊन घोषणाबाजी केली. कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचे पाहून ताफा थांबला. यानंतर जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. यानंतर आंदोलकांनी मंत्र्यांना निवेदन दिले. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, ज्ञानेश्वर माखणे, विजय डाढाळे, नितीन भोसले, आलोक इंगोले आदींचा सहभाग होता. संभाजी ब्रिगेडने गनिमीकाव्याने केलेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला होता. मात्र, दोन्ही मंत्री आणि आंदोलक यांच्यात संवाद झाल्यानंतर निवेदन देण्यात आल्याने पोलीस प्रशासन यंत्रणाही तणावमुक्त झाली.