हिंगोली : मराठा समाजाला तात्काळ ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमारच्या घटनेची सखोल चौकशी करून जखमींना तात्काळ आर्थिक मदत करावी यास इतर मागण्यांसाठी मराठा समाजबांधवांनी ७ सप्टेंबर रोजी हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरपावसात रास्तारोको आंदोलन केले. यादरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अंतरवाली सराटी येथील लाठीमार घटनेचे पडसाद हिंगोली जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून उमटत आहेत. रास्तारोको, निषेध आंदोलने तसेच ठिठिकाणी बंद पाळून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ७ सप्टेंबर रोजी हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रा ते गोरेगाव फाट्यावर मराठा समाजबांधवांनी भरपावसात रास्तारोको आंदोलन केले.पावसाची रिपरिप सुरू असताना आंदोलकांनी एक ते दीड तास रस्त्यावर ठाण मांडले होते. यादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.
मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. यात मराठा समाजाला तात्काळ ओबीसी सवंर्गातून आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी घटनेची सखोल चौकशी करून जखमींना आर्थिक मदत द्यावी, जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निलंबीत करावे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान हिंगोली ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात माळहिवरा, केंद्रा, गोरेगाव, सिरसम बु.सह परिसरातील मराठा बांधव सहभागी झाले होते.