लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जवळा बाजार, येहळेगाव सोळंके येथे बसवर दगडफेक झाली.बीड जिल्ह्यातील परळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शासन त्याची दखल घेत नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांची भाषणेही झाली. यात मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. तर मेगा भरतीत जागा रिक्त ठेवून पुढे त्या भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ आश्वासन असल्याचा आरोप करीत सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. तर शासन यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे म्हणने होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांना सादर केले.जिल्हा कचेरीसमोरील या आंदोलनाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोनि उदयसिंह चंदेल यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बस फोडली : येहळेगावची घटनाऔंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास जमावाने हिंगोली आगाराच्या हिंगोली-परभणी या बसवर दगडफेक केली. बसचा क्रमांक एमएच-२0- बीएल-0५५७ असा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून कुणीतरी हे कृत्य केले. मात्र यानंतरदगडफेक करणारे घोषणाबाजी करीत पळून गेले. याबाबत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बसचे नुकसान झाले असून प्रवासी सुखरुप आहेत. चालक बाबाराव दिंडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.कौठा- वसमत-कुरुंदा मार्गावरील वाहतूक मराठा समाजाच्या धरणे आंदोलनामुळे बंद झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.
मराठा समाजाचे हिंगोलीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:54 PM