लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सरकारने आरक्षण नाही दिलं तर आपण ते मिळवू, जर तुम्हीच लढाई अर्ध्यावर सोडून आत्महत्या करत असाल तर हे आरक्षण काय कामाचे, असा सवाल उपस्थित करत तिरडीवरचे आरक्षण आम्हाला नकोय, असे म्हणत ‘मराठ्यांनो, आरक्षणाची लढाई सुरू आहे, हिंमत ठेवा, आत्महत्या करू नका’ असे आवाहन आ. हर्षवर्धन जाधव यांनी हिंगोली येथे बोलताना केले.हिंगोली येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला आ. हर्षवर्धन जाधव यांनी १२ आॅगस्ट रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत समुपदेशक डॉ. इशा झा, विलास तांगडे, भागवत देवसरकर, संगमेश्वर लांडगे उपस्थित होते. पुढे बोलताना आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मी आमदारकीचा राजीनामा दिला म्हणजे फार मोठे काम केले नाही. मी कन्नडचा आमदार होतो. भविष्यात सुद्धा कन्नडचाच आमदार राहणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वांना लावून धरायचा आहे. त्यासाठी हिंमत धरा, कुणीही आत्महत्या करू नका, जर मावळेच जीव देत असतील तर आरक्षण कशासाठी? ही लढाई अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे आपण खंबीरपणे जगले पाहिजे. आरक्षणासाठी आवाज उठविला पाहिजे. इकडे मराठा सैनिक आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री हसरे फोटो काढतात असा टोलाही आ. जाधव यांनी लगावला. सर्वप्रथम होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांना कामाला लागेल. सरकारही आंदोलन दाबण्याचा प्रयत्नात आहे. मराठा आंदोलकांवर ३०७, ३५३ कलम लावली जात आहेत. ब्रिटीश राजनीती वापरून आंदोलन दडपण्याचा डाव सरकारचा आहे. हे करण्याऐवजी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा. ते होत नसेल तर किमान राज्य पातळीवरून आत्महत्या रोखण्यासाठी तरी पावले उचलावीत. परंतु सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असे ते म्हणाले.आत्महत्येचा मार्ग नको...आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासमवेत नामांकित डॉ. इशा झा या आत्महत्या बाबत जनजागृतीसाठी व समुपदेशनासाठी हिंगोली येथे आल्या होत्या. मार्गदर्शन करताना डॉ. इशा झा म्हणाल्या की, आपल्याला अभ्यासक्रमांत शूरवीरांचे धडे दिले जातात. ते केवळ आपण ते वाचून परीक्षा पास करण्यासाठी नव्हे; तर आयुष्याची परीक्षा पास करण्यासाठी असतात. हे आपण शिकलं पाहिजे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी घेतलेले कष्ट आपणाला प्रेरणादायी आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे कुणीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारता कामा नये.वसमत तहसीलसमोर ठिय्या सुरुचवसमत : येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित रद्द करावेत, आरक्षणासाठी बलिदान देणाºया तरुणाच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी इ. मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर २ आॅगस्ट पासून बेमुदत ठिय्या करण्यात येत आहे. २ आॅगस्टपासून वसमत तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू अकराव्या दिवशी रविवारी आंदोलनात कुरूंदा सर्कलमधील पार्डी, सुकळी, कोठारी, दाभडी, सोमठाणा, कानोसा इ. गावांतील समाजबांधवांसह तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी पुढाकार घेतला होता. दिवसभर मराठा बांधवांकडून तहसील परिसरात भोजनाच्या पंगती बसवून भजन, पोवाडा, शिवरायांवरील गाणी गायली.
मराठ्यांनो, लढाई सुरू आहे; आत्महत्या करू नका- जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:23 AM