लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमुनरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बाजार समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पाच राखीव गणांसाठी सोडत काढण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ही सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांची उपस्थिती होती. या बाजार समितीसाठी मतदार संख्येनुसार १५ गण पाडण्यात आले आहेत. यामध्ये आखाडा बाळापूर, शेवाळा, घोडा (कामठा), कांडली, वारंगा (फाटा), डोंगरकडा, जवळा पांचाळ, दांडेगाव, पेठवडगाव, सिंदगी, नांदापूर, पिंपळदरी, जलालदाभा, लाख, कोथळज या गणांचा समावेश आहे. यापैकी डोंगरकडा व लाख महिला राखीव, दांडेगाव विजा/भज, सिंदगी-नामाप्र, तर कोथळज अनुसूचित जाती/जमातीसाठी राखीव झाले आहे.ही सोडत प्राजक्ता अवचार या बालिकेच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील काही पुढाऱ्यांनीही हजेरी लावली होती.या पुढील टप्प्यात या गणांच्या मतदार याद्यांच्या अंतिमीकरणाचे काम होणार आहे. या सर्व बाबी पूर्ण होताच निवडणूक कार्यक्रम घोषित होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील पुढाºयांना या बाजार समितीच्या निवडणुकीची ओढ लागली आहे. आता ही प्रक्रिया जवळ आली असली तरीही मतदारसंख्या ४५ ते ५0 हजार राहण्याची चिन्हे असल्याने अनेक पुढाºयांना घाम फुटला आहे.
बाजार समितीचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:39 AM