हिंगोली : शहरातील मंडईत रविवारी काही भाज्या स्वस्त तर काही भाज्या महाग विकल्याचे पहायला मिळाले. २६ एप्रिलपासून पाच दिवस मंडई बंद राहणार असल्याने रविवारी अनेक ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे पहायला मिळाले. ग्राहकी मंडईत भाज्या खरेदीसाठी आले होते.
कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढू लागले आहेत. अनेक नागरिक व भाजीविक्रेते नियमांचे पालन करीत नसल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने पाच दिवस मंडई बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्याप्रमाणे येत्या पाच दिवसांपर्यंत मंडई बंद ठेवली जाणार आहे. रविवारी मंडईत भेंडी ६०, चवळी ४० रुपये, काकडी ३० रुपये किलो, आलू २० रुपये किलो, कांदा १५ रुपये किलो, पालक १० रुपयास जुडी, लिंबू १० रुपयास चार, दोडके, कारले, वांगे, शेवगा दहा रुपयांस पाव, गवार १५, कांदे १५ रुपये किलोप्रमाणे विकले गेले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी भाज्यांची आवक चांगली आहे. संचारबंदीचे कारण देत काही भाजीविक्रेत्यांनी भाज्यांचे भाव वाढविल्याचे पहायला मिळाले.
बाजारात अंगूर, चिकू, नारळ, टरबूज आदी फळांची आवक कमीच होती. अंगूर ८०, चिकू ८०, नारळ ६०, टरबूज २० रुपये किलोप्रमाणे विकले गेले. आंबा, डाळिंब, अननस आदी फळांची आवक जास्त असली तरी भावही वाढलेले पहायला मिळाले. आंबे १२५ ते १५०, डाळिंब २५०, अननस ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे भाव होता.
प्रतिक्रिया
सोमवारपासून पाच दिवस भाजीमंडई बंद राहणार आहे. तेव्हा भाजीविक्रेत्यांनी भाजीखरेदी करून कुठे विकावी. कारण मंडई बंद राहणार असून, शहरात भाजी विकता येणार नाही. यामुळे भाज्यांची नासाडी होणे साहजिक आहे.
-शेख मुजीब, भाजीविक्रेता
उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे फळांना मागणीही वाढली आहे. परंतु, फळे घेऊन कुठे विक्री करावी? असा प्रश्न फळविक्रेत्यांना पडला आहे. फळ विक्री जागा बदलली की ग्राहक येत नाहीत. संचारबंदीमुळे ठराविक, अशी जागा फळविक्रेत्यांना राहिली नाही.
-मोईन बागवान, फळविक्रेता