लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : ‘तू दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने त्रास दिला. त्याला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची पतीने तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील मौजे साळवा येथील विवाहिता वैशाली संतोष करंडे (२५) हिने आपल्या राहत्या घरी २८ जुलै रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिला एक चार वर्षांचा मुलगा व पाच महिन्यांची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. याप्रकरणी प्रारंभी बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती; परंतु २ आॅगस्ट रोजी सदर महिलेचा पती संतोष दाजीबा करंडे याने ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, गावातील बापूराव उर्फ सोनू अशोक करंडे हा एक ते दीड वर्षांपासून माझ्या पत्नीला त्रास देत होता, तू दिसायला खूप सुंदर आहेस, माझ्याशी संबंध ठेव, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे म्हणून तो तिला छळत असे. त्याचा छळ असह्य झाल्याने सदर विवाहितेने ही बाब पती संतोष यांना सांगितली. संतोषने सोनू करंडे याला त्याच्या घरी जाऊन समज दिली. माझ्या पत्नीला छळू नकोस, असेही सांगितले. असे दोन ते तीन वेळा सांगूनही सोनूच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मात्र या मनस्तापातून वैशालीने २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली .या घटनेपूर्वी बापूराव करंडे, सुरेखा करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांनी वैशालीच्या घरी जाऊन तिच्याशी वाद घातला होता. तर 'तुझ्यामुळे आमची बदनामी होत आहे, तूच वागायला बरोबर नाहीस, तुझी एखाद्या दिवशी गाढवावरून धिंड काढते 'असे म्हणून मारहाणही केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी संतोष यांच्या फिर्यादीवरून बापूराव उर्फ सोनू अशोक करंडे, सुरेखा करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.