ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.30 - तालुक्यातील मळईवासियांचा रस्त्याच्या मागणीचा प्रश्न रास्त असला तरीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती दिल्यानंतरही ग्रामस्थ बघायला तयार नाहीत. आता तर गावातील एका मुलीचे लग्नच जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लावण्याचा इशारा दिल्याने प्रशासन हैराण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्याची तयारी करण्यात प्रशासन पूर्णपणे व्यस्त असताना मळईवासियांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी विवेक काळे हे स्थळ पंचनामा करण्यासाठी त्या गावातही गेले. त्याचा अहवालही दाखल करणे सुरू आहे. अचानक दुस-या दिवशी म्हणजे ३0 रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यात ३१ मे रोजी गावातील काशीराम पांडे यांची मुलगी छाया हिचा हिंगोली तालुक्यातील जांभरुण आंध येथील धनाजी जटाळे यांचे चिरंजीव नारायण यांच्यासोबत होणार आहे. मात्र गावात जायला रस्ताच नसल्याने हा विवाह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या प्रकाराबाबत तहसीलदार विजय अवधाने यांना विचारले असता ते म्हणाले, प्रशासनाकडून ग्रामस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. अशा प्रकरणांत सुनावणीला महत्त्व आहे. दोनदा अशी सुनावणी झाली. रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यताही दिली आहे. अंतिम निकाल तेवढा बाकी आहे. मात्र ग्रामस्थांच्या आडून काहीजण प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेतकी काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तर ग्रामस्थांना खरेच असा त्रासही होत असल्याशिवाय ते जिल्हा कचेरीच्या प्रांगणात लग्न लावण्याची टोकाची भूमिका घेणेही शक्य वाटत नाही.
उपविभागीय अधिकारी विवेक काळे म्हणाले, मळई ग्रामस्थांना रस्ता देण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. ही मंडळी एकाचवेळी न्यायालयातही दाद मागते अन् प्रशासनाकडेही. शिवाय मी रस्त्याची स्थळ पाहणीही केली. रस्ता देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या कायमची सुटणार आहे. तसे त्या ग्रामस्थांना कळवूनही त्यांनी दिलेला इशारा दुर्देवी आहे.
याबाबत आ.संतोष टारफे म्हणाले, की प्रशासनाने यात लक्ष घालून तोडगा काढणे गरजेचे आहे. यापूर्वीही मी यासंदर्भात अधिका-यांशी बोललो. १६ फुटाचा रस्ता देण्यासाठी प्रशासनाने तयारीही केली आहे. काही कायदेशीर औपचारिकता तेवढ्या बाकी आहेत.
पोलिसांच्या हालचाली : पुन्हा गेले गावात
जिल्हा कचेरीच्या आवारात लग्न लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनाही याबाबत खबरदार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हिंगोली शहर व बासंबा पोलिस सक्रिय झाले होते. हिंगोलीचे पो.नि.जगदीश भंडरवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आमच्या रस्त्याला अडथळा येणार नसेल तर गावात लग्न लावू, असे काहीजण सांगत होते. तर बासंबा पोलिस ठाण्यात पेडगावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदींना बोलावले होते. त्यांनी रस्ता देण्याची तयारी दाखविली होती.
पूर्ण तोडगा नाही..
रात्री आठ वाजेपर्यंत चर्चेचे गु-हाळ सुरू होते. मात्र या प्रकरणात पूर्ण तोडगा निघालेला नव्हता. मंगल कार्याच्या प्रसंगात वादविवाद नको, असे काहींना वाटत होते. तर काही निर्णयावर ठाम होते.