हिंगोली : ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे वाक्य बसवर लिहिले आहे. असे असताना महामंडळाचे बहुतांश चालक व वाहक मास्क न घालताच महामंडळाची सेवा बजावत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. रोज चार-पाच रुग्ण आढळून येत आहेत. कधी-कधी दह-बारा रुग्णही आढळत आहेत. तरीही एस.टी. महामंडळाच्या चालक-वाहकांना याचे काही गांभीर्य दिसून येत नाही. शासनाने कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ होऊ नये म्हणून महामंडळाच्या बस सुरू केल्या आहेत. आजमितीस प्रवाशांची संख्याही वाढत आहे; परंतु काही प्रवासी तसेच महामंडळाचे चालक-वाहक मास्क न घालताच प्रवास करताना दिसून येत आहेत.
एस.टी. महामंडळाने अनेक बसवर ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ अशी घोषणा लिहून ठेवली आहे. घोषणा लिहिली त्यावेळी सुरुवातीला काही दिवस मास्कची विचारणा चालक-वाहक मास्क घालून करत होते; परंतु हल्ली महिनाभरापासून चालक आणि वाहक प्रवाशांना मास्कसंदर्भात विचारणा करणे तर सोडाच, ये स्वत:ही मास्क घालत नाहीत. त्यामुळे ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ या लिहिलेल्या घोषणेला काहीही अर्थ उरत नाही.
जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. प्रवाशांसाठी बस सुरू केल्यामुळे गर्दी वाढू लागली आहे. हे पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने प्रवाशांसह सर्वांनाच मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा, गर्दीपासून दूर राहा, अशा सूचना दिलेल्या आहेत; परंतु बहुतांश प्रवासी या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. जिल्हा प्रशासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या सूचनांचे एस.टी. महामंडळाच्या चालक व वाहकांनी काटेकोरपणे पालन करून स्वत: मास्क वापरून प्रवाशांना मास्कचे बंधन घातल्यास ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ या घोषणेला अर्थ उरेल.
प्रतिक्रिया
कोरोनाचे प्रमाण अजून कमी झाले नाही. स्वत:चे रक्षण करण्यासाठी मास्क हा उपयोगी आहे. प्रवासादरम्यान मी मास्क घालत असतो. काही चालक-वाहक मात्र मास्क घालत नाहीत. त्यांनीही मास्क घालायला पाहिजे.
-सूरज राठोड, प्रवासी
-कोरोना होऊ नये म्हणून मास्क घालणे गरजेचे आहे. घाई, गडबड झाल्यामुळे मास्क घालणे विसरलो. यापुढे मास्क घातल्याशिवाय प्रवास करणार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन प्रवासादरम्यान तंतोतंत करेन व इतरांनाही करायला सांगेन.
-गोरखनाथ गलांडे, प्रवासी
फोटो ०१