- इलियास शेख कळमनुरी (हिंगोली): तालुक्यातील कोंढुर डिग्रस या गावातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज दुपारी बारा ते दीड वाजेच्या दरम्यान घोळवा पाटीजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रस्तोरोकोमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावे, तसेच अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने घोळवा पाटी येथे दीड तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत आरक्षणाची मागणी केली.
निवेदन मंडळ अधिकारी गजानन तेलेवार यांना देण्यात आले. हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावरच दीड तास रास्तारोको करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्तारोको आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनास तहसीलदार सुरेखा नांदे यांनी भेट दिली.