लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची आज इनकॅमेरा बैठक पार पडली. मागच्या बैठकीनंतर उफाळलेल्या वादावरून जि.प.त पहिल्यांदाच समितीच्या बैठकीचेही चित्रीकरण करण्याचा प्रकार घडला. यात प्रामुख्याने शिक्षक प्रतिनियुक्त्या व शाळांची वेळबदलाचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला.शिक्षण सभापती भैय्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज इनकॅमेरा बैठक असल्याने विविध विषयांवर शांततेत चर्चा झाली. यात विठ्ठल चौतमल यांनी सुरुवातीलाच शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द का केल्या जात नाहीत, असा सवाल केला. तहसील, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प. आदी ठिकाणी काम करणाºया शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवर तत्काळ पाठण्याचे आदेश काढा, असा ठराव घेण्यात आला. तर प्राथमिक शिक्षक वगळून इतरांच्या १५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार बदल्या करण्याचा ठरावही मांडला. यात माध्यमिक शिक्षक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आदींचा समावेश आहे.चट्टोपाध्याय वेतनश्रेणीचा मुद्दाही मांडण्यात आला. शासनाने पाठविलेल्या पत्रानुसार आॅक्टोबर २0१७ पर्यंतच्या पात्र शिक्षकांना जुन्या नियमांप्रमाणेच या वेतनश्रेणीचा लाभ देण्याची मागणी चौतमल यांनी केली. तर त्यानंतरच्या शिक्षकांना पुढील शासन निर्णयानुसार लाभ द्यावा, असे ते म्हणाले. तर सेसअंतर्गत २0 लाखांच्या चटई व प्रयोगशाळा साहित्य खरेदीस पुन्हा मान्यता देण्यात आली. तर जागतिक दिनानिमित्त सर्व महिला सदस्यांचा सत्कारही केला. यावेळी जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण, रुपाली पाटील गोरेगावकर, संगीता शिंदे, गंगासागर भिसे, एकलारे, भगवान खंदारे आदींची उपस्थिती होती.शाळांची वेळाबदलदरम्यान आजच्या बैठकीत उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात करण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
शिक्षण समितीची बैठक ‘इन कॅमेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:05 AM