लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भाजप नेते रामरतन शिंदे यांनी कयाधूच्या पुनर्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. नदीकाठातील ४८ गावांत ३१ दिवस पाहणी करणार आहेत. आतापर्यंत सात ते आठ गावांत बैठका झाल्या. रूंदीकरण व खोलीकरणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सेनगाव तालुक्यातील कयाधू नदी काठावरील गावाला रामरतन शिंदे यांनी भेटी दिल्या. पार्डी पोहकर येथे ग्रामस्थांना बोलतांना शिंदे म्हणाले की, समाजाभिमुख चळवळीत तरूण, ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने या ठिकाणी जेसीबी लावण्यात येणार आहे. ज्यांना जे शक्य असेल त्यांनी ती मदत यासाठी करावी. जनजागृती कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार असून, नदीकाठातील ४७ गावे ३१ दिवस आपला सहभाग नोंदविणार आहेत. पैनगंगा नदीसारखी रूंदी आणि खोली कयाधूची करण्याचा मानस आहे. शेवटी शिंदे यांनी सर्व ग्रामस्थांना शपथ दिली की, आम्ही ३१ दिवस कयाधू नदीच्या पुनर्जीवनासाठी नि:स्वार्थीपणे श्रमदान करेल, अतिशय उत्साहाने उपस्थित सर्व ग्रामस्थांनी ही शपथ घेतली. शिंदे यांनी सुरू केलेली कयाधू नदीच्या पुनर्जीवनाच्या चळवळीचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच लोकचळवळ होणार आहे. रूंदीकरण व खोलीकरणात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथे सायंकाळी ७ वाजता तर नागा सिनगी येथे ७.३० वाजता कयाधू नदी पूनर्जीवनासाठी जनजागृतीपर बैठक झाली. बैठकीस सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून संकल्पना, समस्या मांडल्याचे रामरतन शिंदे यांनी सांगितल.
कयाधू नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:54 PM