कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, हारवाडी, म्हैसगव्हाण, करवाडी, नांदापूर व औंढा तालुक्यातील जामगव्हाण, आमदरी, राजदरी, कंजारा, पिंपळदरी, सोनवाडी, येडुद, आदी गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवले असतानाही प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, असे जामगव्हाण येथील माजी सरपंच सुरेश अप्पा मळसेटवार यांनी सांगितले.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कळमनुरी व औंढा या दोन तालुक्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत; परंतु ते किती रिश्टर स्केलचे झाले आहेत याची नोंद मात्र कळाली नाही.
सोडेगावात बसले चार धक्के...
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे भूकंपाचे दिवसभरात चार धक्के बसल्याने ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. राखी पौर्णिमेचा सण असल्याने अनेकजण घरीच बसले होते. भूकंपाच्या सौम्य धक्क्याने मात्र नागरिकांची धावपळ उडाली.